छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावत खरीप हंगामाला नवसंजीवनी दिली आहे. बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर गुरुवारीही अनेक तालुक्यांत कायम राहिला. काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने नद्या-नाल्यांना पूर आला असून शेतशिवार जलमय झाले आहेत.
कन्नड तालुक्यातील करंजखेड परिसरात बुधवारी रात्रीपासून सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसामुळे पूर्णा नदीसह लेंडी, कसारी आणि दावडी नाल्यांना पूर आला आहे. केवळ करंजखेड येथेच गुरुवारी सायंकाळपर्यंत 87 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पेरण्या झालेल्या पिकांना बळ मिळाले आहे. उंडणगाव व लिहाखेडी परिसरात सलग दोन दिवस पडलेल्या भीज पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी यासारख्या पिकांना जीवदान मिळाले. आठवडी बाजारात मात्र पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली, काही व्यापाऱ्यांचे नुकसानही झाले.
बनकिन्होळा, भायगाव, वरखेडी व परिसरातही मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांचे चेहेरे खुलले असून दुबार पेरणीचे संकट टळल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले आहे. सोयगाव, बनोटी, काळदरी परिसरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. अग्नावती नदीला पूर आला असून काळदरी धरणही ओव्हरफ्लो झाले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने एक एसटी बस अडकल्याची घटना वडगाव फाट्यावर घडली. चालक-वाहकांनी दक्षता घेत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
खुलताबाद तालुक्यात संततधार पावसामुळे छोटे नदी-नाले वाहू लागले. बाजारसावंगी भागात दोन दिवसांच्या संततधारेने काही धाब्यांची घरे गळू लागली आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. महसूल विभागानुसार गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंतच्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 25.30 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
यामध्ये कन्नड तालुक्यात सर्वाधिक 60.70 मिमी, तर वैजापूरमध्ये सर्वात कमी 7 मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात पेरण्या 70-80 टक्क्यांपर्यंत झालेल्या असून पावसाच्या या पुनरागमनाने पिकांच्या उगमास मोठा हातभार लागला आहे. शेतशिवारात पाणी साचल्याने शेती कामांना गती मिळणार आहे. काही भागांत पिके पिवळी पडण्याचा धोका असला तरी एकंदरित चित्र शेतकऱ्यांना आश्वासक वाटत आहे.